कोविड-१९ : एक वेगळा अनुभव
प्रथम बुक्सच्या पुस्तकांचा अनुवाद करायला मला नेहमीच आवडतं. त्यायोगे लहान मुलांच्या विश्वात थोडं रमता येतं. प्रथम बुक्सचा पुस्तकं प्रकाशित करण्यामागचा उद्देशही खूप वेगळा आहे. त्यांची पुस्तकं नेहमीच वेगवेगळ्या विषयांतल्या क्लिष्ट संकल्पना लहानग्यांपर्यंत अतिशय रंजक पद्धतीनं पोहोचवतात. त्यांतील चित्रेदेखील विषय सोप्या रीतीने समजून घ्यायला मदत करतात तसेच लहान मुलांना पुस्तकांकडे आकर्षित करतात.
कोविड-१९ वरील पुस्तकाचा अनुवाद करण्याचा अनुभव मात्र आधीच्यापेक्षा खूपच वेगळा होता. एक तर हे ताज्या विषयावरचं पुस्तक. यात लहान मुलांना सांगण्यासाठी काय लिहिलं असेल याची उत्सुकता होती. या पुस्तकात हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे. सध्या सगळ्यांचंच लक्ष कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर केंद्रित झालंय. प्रत्येकजण सुरक्षित रहाण्याचा प्रयत्न करतोय. दूध, भाजी वगैरे जीवनावश्यक गोष्टी वेळेत मिळतील याची काळजी घेतोय. ऑफिसच्या कामाची चिंता तर वेगळीच. या सर्व धावपळीत लहान मुलांच्या भावनाविश्वात काय घडत असेल? ती सध्या घरीच जखडून पडलेली आहेत. टीव्हीवरच्या बातम्या पहात आहेत. मोठ्या माणसांच्या चर्चा ऐकत आहेत. त्याचा त्यांच्या वयानुसार अर्थ लावत आहेत. कोविड-१९ च्या लेखकांनी हे नेमकं हेरलंय आणि मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं दिलेली आहेत. तसेच त्यांनी सुरक्षित कसं रहावं याचा सोप्या पद्धतीनं संदेशही दिलाय. ही गोष्ट भाषांतर करताना मला प्रकर्षानं जाणवली.
पुस्तकातली पात्रं ही प्रथम बुक्सच्या नेहमीच्या वाचकांच्या परिचयाची आहेतपण या पात्रांना आता पडलेले प्रश्न हे सध्याच्या परिस्थितीतील मुलांच्या मानसिकतेशी जुळणारे आहेत, असंही जाणवलं. आपण घरात एकटे आहोत म्हणून कंटाळण्याचं काहीच कारण नाही. घरातल्या घरात इतरांशी खेळू शकतो हे सांगणारा भैय्या, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवायला सांगणाऱ्या मीरा आणि अमीरा, चेहऱ्याला हात लावू नका म्हणून सांगणारी फरीदा आणि कोविड-१९ ची लक्षणं अगदी सोप्या भाषेत सांगणारी अम्माची या साऱ्या पात्रांनी सांगितलेल्या गोष्टी लहान मुलांना पटकन भावणाऱ्या आणि पटणाऱ्याही आहेत असं मला वाटतं. मोठ्यांनी नुसत्या सूचना देण्यापेक्षा हे पुस्तक वाचून मुलांना हा विषय जास्त चांगल्या पद्धतीनं कळू शकेल. नीमा हात धुता धुता वाढदिवसाचं गाणं म्हणते. तेही दोनदा. यातून हात जास्त वेळ धुवायला हवेत हा संदेश नकळत देण्याची कल्पना मला फार आवडली. तसेच वाढदिवसाला कोणी मित्रमैत्रिणी येऊ शकणार नाहीत म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा सगळा केक आता एकट्याला खायला मिळेल या मजेशीर बाबीकडं हे पुस्तक मुलांचं लक्ष वेधून घेतं.
मुलांना पटकन समजावं आणि नीट लक्षात रहावं म्हणून काही गाणी या पुस्तकात आहेत. त्यांचा मूळ अर्थ तोच ठेवून भाषांतर करताना मराठीत यमक जुळवायला खूपच मजा आली.
या कसोटीच्या काळात डॉक्टर आणि इतर क्षेत्रातील लोक आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत असा मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा संदेश हे पुस्तक देतं. अगदी योग्यवेळी हे पुस्तक मुलांसमोर येतं आहे. हे पुस्तक मुलांना सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सकारात्मक विचार करायला उद्युक्त करेल, अशी मला खात्री आहे.
अतीश कुलकर्णी
Click here to read the book on StoryWeaver.