Uncategorized

अनुवाद: प्रत्येक अनुभव नवा

IMG_20150625_113322199.jpg30th September is celebrated as International Translation Day. It was launched as an idea to show solidarity of the worldwide translation community in an effort to promote the translation profession in different countries. This is an opportunity to display pride in a profession that is becoming increasingly essential in the era of progressing globalisation. Pratham Books’ language editors and translators are celebrating this day through a series of blog posts.

(This post was written by Meera Joshi. Meera Joshi has been a journalist for the last about 25 years. Currently, she is into freelance content writing, translations and editing, with more focus on children’s informal education.) 
**********
Introduction to the blog:
Translation of children’s books? I would do it in a jiffy, I had thought in the beginning. I soon realized how naïve I was. It’s not difficult, but not easy either! The choice of words has to be meticulous and the language simple, child-friendly. We cannot presume anything, since children are still learning the language. So, as I translated more and more children’s stories/texts, it became a new learning experience each time. And an absolutely enjoyable one.

अनुवाद: प्रत्येक अनुभव नवा

मुलांसाठीच्या गोष्टी/लेखनाचा मराठी अनुवाद करायला सुरुवात केली, तेव्हा वाटलं होतं मोठ्यांसाठी अनुवाद करण्यापेक्षा हे सोपं असेल. फार गहन मजकूर नाही. छोटी वाक्यं, सोपे शब्द वापरायचे. थोडक्यात, हसत-खेळत होईल. माझा हा भ्रम लवकरच दूर झाला. ही अनुवाद प्रक्रिया आनंददायी नक्कीच आहे. अनुवाद करतांना आपण लहान मुलांच्या निरागस, रंगतदार जगात वावरतो. पण अनुवाद ‘चुटकीसरशी झाला’ असं होत नाही.
इथं शब्द खूप विचारपूर्वक वापरावे लागतात. अर्थाच्या दृष्टीनं मूळ लेखनाच्या अधिकाधिक जवळ, तरीही सहज, प्रवाही, मुलांना रस वाटेल अशी भाषा हवी. मुलांना ‘हे माहीतच असेल’ असं गृहीत धरता येत नाही. कारण ती अजून भाषा शिकत असतात. वाचनपातळी डोळ्यासमोर असली तरी मुलांची शब्दसंपत्ती किती असेल याची पक्की खूणगाठ बांधता येत नाही. म्हणजे, मुलांच्या वयानुसार त्यांचं शब्दज्ञान कमी-जास्त असणार हे एक. पण शहरी, निमशहरी भागातली वाचक-मुलं हा एक स्तर. याखेरीज, मराठी मातृभाषा असलेली, पण इंग्रजी माध्यमात शिकणारी हाही एक वर्ग ह्ल्ली डोळ्यासमोर ठेवावा लागतो. भरीला, इंटरनेट, मोबाईल फोनवरून शुद्ध-अशुद्ध भाषेचा मारा होत असतो. अशा सर्व स्तरातल्या मुलांना, वापरलेल्या भाषेबद्दल जवळीक वाटली पाहिजे.
लिहिण्याच्या ओघात शक्य तिथं नवीन शब्दांची ओळख करून देणं हे एक उद्दिष्ट असतंच. पण नव्या शब्दांचा फार भडिमार करूनही चालत नाही. कारण वरचेवर न ऐकलेले शब्द येऊ लागले तर वाचनातला रस जाऊ शकतो. उदा. ११-१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या एका गोष्टीचा (`माझ्या दोन पणज्या’) अनुवाद करताना भणाण वारा, समुद्राची गाज हे शब्द वापरावेत का असा प्रश्न मला पडला होता. विचारांती हेच शब्द योग्य वाटले. मात्र याच गोष्टीत ‘अंत्यसंस्कार’ (मूळ इंग्लिश गोष्टीतील great grandmother’s funeral) हा शब्द जरी मी एके ठिकाणी वापरला, तरी राहून राहून मला तो मुलांच्या दृष्टीनं जड वाटत राहिला.
राजा-राणीची एक गोष्ट होती (कोट्टावी राजाची झोपाळू नगरी). त्यांच्या राजवाड्याच्या बागेत असलेल्या ‘जाई-जुईच्या मांडवापर्यंत’ ते फिरायला जातात, असा उल्लेख मी केला. पूर्वी जवळपास घरोघरी अंगणांमध्ये जाई-चमेलीचे मांडव असायचे. आता ते कमी झालेत. मग मुलांना कसं कळेल? पण काही गोष्टी त्यांच्या कल्पनाशक्तीवर सोडून द्यायच्या. शिवाय मदतीला गोष्टींबरोबरची चित्रं असतातच.
त्या-त्या प्रादेशिक भाषांमधले, संस्कृतीदर्शक काही खास शब्द मराठीत आणताना पेच पडू शकतो. पोशाखांचे, खाण्याचे प्रकार याची मूळ नावं तशीच राहू शकतात. कारण एकतर त्यांना मराठी प्रतिशब्द असतीलच असं नाही. आणि दुसरं म्हणजे, मुलांना अन्य संस्कृतीतील शब्दांची ओळखही होऊ शकते. इतर प्रादेशिक भाषांमधले “अम्मी-अप्पा-अब्बा’ हे मराठीत बहुधा आई-बाबा होतात. पण एका हैदराबादच्या परिसरातील गोष्टीत, मुलांच्या आईला ‘अम्मी’च ठेवणं मला गोष्टीतल्या एकंदर वर्णनाशी सुसंगत वाटलं. (गोष्ट: दम दमादम बिर्याणी).
मात्र वर उल्लेख केलेल्या पणज्यांच्या गोष्टीतल्या सांस्कृतिक संदर्भानं मला जरा कोड्यात टाकलं. मूळ गोष्ट नॉर्वेजियन होती. वाचन पातळी ४, म्हणजे आपलं आपण वाचू शकणाऱ्या मुलांसाठी. गोष्टीतली मुलगी तिच्या दोन पणज्यांबद्दल सांगते आहे. त्यात ती सुरुवातीला सांगते, “`माझे बाबा एका लांबसडक, तपकिरी केसाच्या मुलीच्या प्रेमात पडले. मग तीच माझी आई झाली.” नंतर विचार करतांना वाटलं की मूळ गोष्टीतलं हे वर्णन मराठीत तसंच ठेवतांना आपण आपल्या मुलांना जरा जास्तच गृहीत धरलं की काय!! ती मुलगी आणि तिच्या दोन पणज्या यांच्यातले भावबंध मात्र अगदी आपल्याकडच्या नातवंडं-पतवंडांसारखेच.
अर्थात अशा विचारमंथनातूनच अनुवाद प्रक्रिया अधिकाधिक सरस होत जाईल, हे नक्की.
अनुवादित गोष्ट एकदा मोठ्यानं, कथन केल्यासारखी वाचून बघणं या उपक्रमाचा पण फायदा होतो. त्यातून काही भाग बाद होतो, काही नव्यानं लिहिला जातो. अनुवादाची भट्टी नीट जमली आहे की नाही हे आपलं आपल्याला कळण्याचा तो एक मार्ग असतो.
प्रत्येक अनुवादागणिक काही नवीन दृष्टी मिळते हेही खरंच. आणि म्हणूनच त्यातला आनंद कायम राहतो.
Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

DISCLAIMER :Everything here is the personal opinions of the authors and is not read or approved by pratham books before it is posted. No warranties or other guarantees will be offered as to the quality of the opinions or anything else offered here