Uncategorized

गोष्टी विणताना… (While Weaving the Stories)

By Mrinalinee Vanarase

गोष्टी विणताना…

गोष्ट! गोष्टीचं महत्व काही नव्याने सांगायला नको. स्टोरीवीव्हर मित्रमैत्रीणीना तर नकोच नको. त्यांना ठाऊक आहे, आपण गोष्ट सांगतो, गोष्टींनी माणसं जोडतो. माणूस ही गोष्ट रचणारी-सांगणारी-ऐकणारी प्रजाती नाही का! माणसाने लिखाण आणि वाचनाचे तंत्र शोधून काढले त्याच्या आधीपासून गोष्टी सांगितल्या-ऐकल्या जात आहेत.

लहान असताना काही मला रानव्याचा अनुभव फारसा घेता आला नाही. जवळपासचे एक दोन गड-किल्ले किंवा जवळची टेकडी बघणं इतकंच घडू शकलं. तेंव्हा ऐकलेल्या गोष्टी मात्र मनात बीजं पेरत राहिल्या. अनेक तऱ्हांनी हे दाखवत राहिल्या की माणसाचं निसर्गाशी नातं काय! गोष्टींमधे भारलेली जंगलं होती, अद्भुत प्राणी होते, लांबच लांब नदया आणि समुद्र होते. त्या सगळ्यांचं गारुड मनावर नाही झालं तरच नवल. या गोष्टीनी माणसं एकमेकांशी आणि आजूबाजूच्या निसर्गाशी कशी वागतात, वागू शकतात यापुढे आरसा धरला. मी ऐकलेल्या गोष्टींत साहस होतं, आनंद, ध्यास, दुःख, कष्ट सारं काही होतं. बाहेरचं जग कसं आहे याची लहान मुलाच्या मनात एक उत्सुकता असते. त्या जगाचं एक कल्पनाचित्र तयार करायला या गोष्टी हातभार लावत होत्या.

पुढे मी माझ्या औपचारिक शिक्षणाचा भाग म्हणून ‘माणूस-निसर्ग संबंध’ याविषयाचा अधिक सखोल अभ्यास केला. याच विषयामधे एम ए ची पदवी घेतली. आणि पुढे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनाचं शिक्षणही घेतलं. अनेक व्यक्ती, जमीनमालक आणि विकसक, सरकारी नोकर, राजकारणी यांच्यासोबत सल्लागार म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आमच्या गोष्टी एक नाहीत. काहींच्यापाशी तर गोष्टीच नाहीत. मी विचार करू लागले, मी ऐकलेल्या गोष्टींबद्दल, त्यांनी माझ्या मनावर जो ठसा उमटवला त्याबद्दल. गोष्टींचं महत्व पुन्हा एकदा जाणवलं. नव्या गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजेत असंही जाणवलं. त्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यातील अनुभवांबद्दल विचार करायला शिकवतील, त्याबद्दल नवे दृष्टीकोन देतील आणि जगणं अधिक मजेचं करतील. 

स्वतः गोष्टी लिहित असतानाच मला प्रथमच्या स्टोरीविव्हर प्लाटफॉर्मसाठी एक गोष्ट भाषांतरित करण्याची संधी मिळाली आणि एक नवं दालन माझ्यासाठी खुलं झालं. इथे कथा लेखक होते, भाषांतरकार होते, चित्रंकार आणि या सगळ्याशी जोडले गेलेले अनेकजण होते ज्यांनी हे दालन समृध्द केलं आहे. स्टोरीविव्हरची ओळख झाल्यावर असं वाटलं की ही आपली दुनिया आहे. गोष्ट सांगणाऱ्या-दाखवणाऱ्यांची दुनिया. इथे मन रमून गेलं नाही तरच नवल. इथे कथा लिहिणाऱ्या लेखकांसाठी भाषांतरकार म्हणून काम करणं मजेचं होतं आणि आहे. अनेक अद्भुत गोष्टी आणि त्यांची अतीव सुंदर मांडणी. माझी निसर्ग-पर्यावरण विषयक पार्श्वभूमी लक्षात घेऊन माझ्याकडे त्या विषयाशी थेट संबंधित असलेल्या गोष्टी भाषांतरासाठी अधिकतर आल्या. पण तशी तर प्रत्येक गोष्टच महत्वाची.

मी भाषांतरित केलेल्या गोष्टींत ‘दोन नंबरची गोष्ट’ माझ्या विशेष लक्षात राहिली आहे. मला असं वाटलं की मुलांना एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे गांभीर्याने बघायला मदत करण्यासाठी एवढी हसतखेळत सुरवात सापडणं अवघड आहे. म्हटले तर ही कथा नाही, पण कथेएवढीच रंजन करणारी माहिती आहे. माझ्या आसपासच्या अनेकांनी या गोष्टीची माझ्याकडे विचारणा केली आणि मुलांना ती भावल्याचंही आवर्जून कळवलं.

बँडीकोटाताई बेंगालेन्सिसच्या साहससफरी ही अशीच एक भन्नाट कल्पना. बँडीकोटा बेंगालेन्सिस हे घुशीचं शास्त्रीय नाव. बँडीकोटाताई बीळ खणत दूरवर जातात आणि दरवेळी एका नवीन भूप्रदेशात उगवतात. नावापासूनच या कथेत नाविन्य आणि मजा आहे. या सफरी जिथे घडतात ती ठिकाणं मी पाहिलेली असली तरी एका घुशीच्या नजरेतून सारं पाहणं फार मजेशीर होतं. मुलांना बँडीकोटाताई आवडणार यात काय आश्चर्य!

मुलांना गोष्टी सांगता सांगता इतिहासात त्यांना किती मागे घेऊन जाता येऊ शकतं? काही लाख किंवा अब्ज वर्षं सुद्धा अगदी आरामात हे मला ‘जुन्या जगाचे रहिवासी’ या कथेतून समजलं. पुराजीवशास्त्र असं काही असतं हे मी लहान असताना मला कुठे माहित होतं? स्टोरीविव्हरच्या गोष्टी ऐकणाऱ्या मुलांना मात्र तो प्रश्न नाही!

या कथा आता ऑडीओ स्वरूपात ऐकायला उपलब्ध होत आहेत. मी भाषांतरित केलेल्या काही गोष्टींचे नाट्यरूप सादरीकरण  देखील झालं. गोष्टरंग नावाच्या एका उपक्रमाअंतर्गत ‘चिपको रुजले त्याची गोष्ट’ आणि ‘जपून रे सत्तू’ या मी भाषांतरित केलेल्या गोष्टी अतिशय मेहेनती कलाकारांनी सादर केल्या आणि महाराष्ट्रात दूरवर पोचवल्या.  ही सगळी सफर आनंददायी होती. पुढेही असेल अशी आशा व्यक्त करते. उत्तम कथा विणल्या जावोत…कथा सांगणाऱ्यांचा पंथ वाढत राहो.

– मृणालिनी वनारसे 

Mrinalinee Vanarase is a translator who has deep interest in ecology and has translated many of our environment and nature books into Marathi 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

DISCLAIMER :Everything here is the personal opinions of the authors and is not read or approved by pratham books before it is posted. No warranties or other guarantees will be offered as to the quality of the opinions or anything else offered here