अनुवाद – एक समृद्ध करणारा अनुभव
by Sushrut Kulkarni
A lot is said about the dearth of multilingual books for children in India. In the last decade, there has been a rise in the production of children’s literature in regional languages by means of translation. Readers from India and across the world have a lot to gain from the improved access to books in native languages. However, It is not only readers but also the translators who gain value by participating in the process of translations.
मुलांसाठी पुस्तकांचा अनुवाद करणं म्हणजे जणू तारेवरची कसरतच. लेखकानं जे लिहिलं आहे, ते अनुवादकाला पोचवावं लागतंच, पण अनुवादित पुस्तकाची भाषा परकी वाटूनही चालत नाही. एकवेळ मोठी माणसं पुस्तक विकत घेतलं आहे, म्हणून बळेच रेटत का होईना ते पुरं करतात. मुलं या बाबतीत मात्र अजिबात क्षमाशील नसतात. पुस्तक जराही कंटाळवाणं वाटलं, की ते त्यांनी बाजूला ठेवलंच म्हणून समजा. लेखक किती मोठा आहे, यांसारख्या गोष्टींचं ती दडपण बाळगत नाहीत. मुलांना पुस्तक रंजक न वाटण्यामागे दोन कारणं असतात. पहिलं, म्हणजे पुस्तकातला आशय किंवा त्याच्या कथावस्तूतलं वातावरणच मुळात परकं वाटणं. त्याला फारसा इलाज नसतो. दुसरं मुख्य कारण म्हणजे पुस्तकात’मराठीपण’ नसणं.
पण मराठीपण म्हणजे काय? सगळ्या अनुवादित पुस्तकांत सारे शब्द तर मराठीच असतात. मग हे मराठीपण नेमकं असतं कशात? एक उदाहरणच पाहूया ना!
“I cannot do this,” she said या वाक्याचा अनुवाद कसा होईल?
एखादा अनुवादक चटकन तो “मला ते जमत नाही,” ती म्हणाली. – असा करेल.
पण त्याउलट चांगला अनुवादक “मला नाही रे ते जमत,” ती म्हणाली. – असा करेल.
दुसऱ्या वाक्यात सगळे शब्द तेच आहेत. फकत बोलीभाषेनुसार त्यांची पुनर्मांडणी आणि ’रे या एका छोट्याशा अक्षराची भर यानं वाक्याला मराठीपण आलं आहे. नुकतंच प्रथम बुक्सनं The Right Way School नावाचं एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केलं. सगळ्या गोष्टी एका विशिष्ट प्रकारेच केल्या जाव्यात असा सतत आग्रह धरणाऱ्या टोकाच्या शिस्तबद्ध शाळेची ही गोष्ट. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायची मुभा न देणाऱ्या शाळांपैकी ही एक शाळा. पण त्याचं मराठी रुपांतर करताना The Right Way School या शीर्षकाचं भाषांतर करायचं तरी कसं? योग्य मार्गप्रिय शाळा असं भाषांतर अचूक झालं असतं खरं, पण अशा नावाचं पुस्तक मूल हातात धरेल तरी का? मग आम्ही याचा अनुवाद केला “अ.ति. शिस्ते शाळा” असा. या काहीशा अतिशयोक्तीपूर्ण नावामुळं त्याबद्दलची अप्रियता तर टळलीच, त्याउलट काहीशी व्यंगार्थी शीर्षाकामुळं मुलानं पुस्तक उत्सुकतेनं पाहण्याची शक्यता वाढली.
विख्यात कन्नड साहित्यिक वनमाला विश्वनाथ अनुवादकलेबद्दल सल्ला देताना म्हणतात, “अनुवादाला सुरुवात करताना कुठलंही बंधन मानू नका. स्वतंत्र लेखनाप्रमाणं ते मुक्तपणे करा. Just freak out!” असा मुक्तपणे अनुवाद करताना अनुवादकानं बेबंद स्वातंत्र्य घेणं त्यांना अपेक्षित नाही, तर आपल्या मातृभाषेची लय पकडून, तिचे गुणविशेष लक्षात घेऊन लिहिणं त्यांना अपेक्षित आहे. म्हणजे केवळ शब्दांचाच नव्हे, तर संस्कृतीचा अनुवाद त्यात होतो आहे ना, हेही अनुवादकानं जरूर पाहिलं पाहिजे. (अर्थात मुक्त लेखकाची भूमिका करून झाल्यावर काही काळानं आपलं लेखन संपादकाचा चष्मा चढवून वाचायचा सल्ला द्यायला त्या विसरत नाहीत.)
बरेचदा वाचक अनुवादित पुस्तक वाचताना मूळ पुस्तक वाचल्याची मजा येत नाही, अनुवादात काहीतरी हरवलं आहे अशी तक्रार करत असतात. अनुवादकाच्या मर्यादांमुळं अनेकदा Lost in translation अशी दुरवस्था ओढवते. मात्र जो अनुवादक सजगपणे अनुवाद करेल, तो आपल्या मातृभाषेचा आणि संस्कृतीचा विचार करून ते करेल. इंग्रजीत अनेकदा रस्ता क्रॉस करणाऱ्या कोंबडीच्या पिल्लांचा संदर्भ येत असतो. ते सारं जसंच्या तसं, शब्दश: अनुवादित केलं तर मराठीभाषक मुलांना कळेल का? अशावेळी त्याचा थेट अनुवाद न करता जर त्याऐवजी विक्रम वेताळाच्या गोष्टीतल्या अनुत्तरित प्रश्नांचं उदाहरण दिलं तर वाचकाला चटकन समजतं.
अनुवादक जेव्हा वाचकाच्या नजरेतून विचार करू लागतो, तेव्हा अनुवादाचं मूल्य कमी तर होत नाहीच, उलट ते वाढतं. खुद्द अनुवादक लेखक म्हणून अधिक समृद्ध होत जातो. सजगपणे अनुवाद केल्यानं Lost in Translation ऐवजी Gained in Translationची अनुभूती अनुवादक आणि वाचकाला नक्की येते.