Type to search

प्रसन्न चित्रांमधून उलगडणारी गोष्ट: हे कुणी केलं?

  • February 10, 2020
  • admin
Share

‘मुलांच्या आवडत्या लेखक आणि चित्रकार माधुरी पुरंदरे यांचं अगदी नवं कोरं मराठी पुस्तक’ -एवढं म्हणलं तरी वाचक अगदी सरसावून बसतील याची खात्री आहे. त्यांची चित्रं-पुस्तकं इतकी प्रेमानं आणि पुन्हा-पुन्हा वाचली, ऐकली आणि बघितली जातात की त्याला तोड नाही. 

छोट्या वाचकांसाठी, ‘हे कुणी केलं ?’ या नावाचं  त्यांचं पुस्तक नुकतंच स्टोरीविव्हरवर प्रकाशित झालंय. मुलांच्या कुतूहलाचा, गमतीचा विषय आणि प्रसन्न, खेळकर चित्रं  हे त्याचं वैशिष्टयं. निसर्ग आणि प्राणिजगत अगदी रसरशीतपणे चित्रांत येतं. ही चित्रं एवढी बोलकी आणि प्राण्यांच्या भाव-भावना व्यक्त करणारी आहेत की शब्द न वापरता चित्रातूनही गोष्ट समजू शकते. 

‘शी आणि शू’- हे एका विशिष्ट वयामध्ये मुलांच्या प्रचंड कुतूहलाचे विषय असतात. ‘प्राण्यांची शी’ या विषयाभोवती गुंफलेली ही गोष्ट इतकी मजेदार आहे की ती  बघायला आणि वाचायलाच हवी. 

वेगवेगळ्या प्राण्यांची शी कशी वेगवेगळी असते? शी बघून प्राणी कोणता हे ओळखता येतं का? अशा शास्त्रीय प्रश्नांची गंमत मुलांना घेता येते. त्याचबरोबर निसर्ग आणि प्राणी  यांचं निरीक्षण करण्याची आवड निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी नक्कीच हातभार लावू शकतात. 

या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक-चित्रकार माधुरी पुरंदरे यांच्याशी बातचीत झाली. 

Illustrated by Madhuri Purandare for ‘हे कोणी केलं?’

Illustrated by Madhuri Purandare for ‘हे कोणी केलं?’

प्रश्न: ‘हे कुणी केलं’ या पुस्तकाची कल्पना कशी सुचली?
“जवळपास ३० वर्षांपूर्वीची ही घटना आहे.  बालवाडी शिक्षिकांसाठी  ‘वनस्थळी’  या मासिकाचं मी संपादन करत होते. एकदा बोलताना एक लेखक म्हणाले, “मुलांना या विषयाबद्दल खूप कुतूहल असतं. तुम्ही का नाही लिहीत?” त्यावेळी वाटलं, मुलांना उत्सुकता असते आणि फारसं काही लिहिलं -बोललं जात नाही त्याविषयावर हे खरं आहे. पण त्यावेळी वाटलं की लेखनातून हा विषय कदाचित नाही स्वीकारला जाणार. थोडी साशंकता होती मनात त्यामुळे नाही लिहिलं तेव्हा. विषय म्हणून तेव्हापासून डोक्यात मात्र राहिला. मग अलीकडेच एका विज्ञान मासिकात, प्राणी-पक्षी आणि त्यांची शी याबद्दल माहितीपर लेखन आलेलं पाहिलं. ‘चकमक’ या मासिकातही वाचलं आणि पुन्हा एकदा हा विषय डोक्यात घोळायला लागला.

मात्र, मी हे जे काही वाचलं होतं ते माहितीपर होतं आणि तसं लिहिण्यात किंवा नुसती माहिती देण्यात मला मुळीच रस नव्हता. अवघडलेपणानं तो विषय मांडलाय असंही नको होतं. त्यामुळेच ‘एक प्राणी असं म्हणाला, त्यावर दुसरा तसं म्हणाला’ या अंगानं गोष्ट न्यायची नव्हती.

प्राण्यांचे रोजचे छोटे छोटे व्यवहार, त्यांच्या हालचाली यातून मला नाट्य उभं करायचं होतं. गोष्ट म्हटली की त्यात संघर्ष हवा.  शिवाय या छोट्या नाट्याचं रूप प्रसन्न हवं होतं. चित्रांची शैली, त्यातल्या छोट्या- छोट्या गमती यातून ते साधता आलं.

‘शी’ सारखा एखादा विषय मुलांच्या कुतूहलाचा असेल, तर त्याचा नीट उलगडा केला जात नाही. मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हवी असतात. ती मिळत नाहीत. प्राणी शी करत असेल तर ‘तिकडे बघू नकोस हं’ असंच बहुधा दटावलं जातं. त्यांना कुतूहल वाटतं त्या गोष्टीचा उलगडा करण्याऐवजी आपण जर त्यांना म्हणत बसलो की, ते काहीतरी घाण आहे, तर त्यांचं समाधान कसं होईल?

एकदा का मुलांना उत्तरं मिळाली की त्यांचं कुतूहल शमतं. म्हणून मग नाट्यपूर्ण प्रसंगातून आणि खेळकर चित्रांच्या सहाय्यानं ही गोष्ट सांगायचं ठरवलं.”

प्रश्न:  मुंगी ते बैल एवढा प्राण्यांचा आवाका या गोष्टीत आहे. पुस्तक नीट बघितलं तर अनेक गमती त्यात सापडतात. उदाहरणार्थ, मुख्य गोष्टीचा भाग नसलेला पण चित्राच्या तळाशी छोट्या अक्षरात असलेला मुंगीचा संवाद. ‘चल गं बाई! तू कशी करतेस ते कोणालाही बघायचं नाहीये!’ हे वाचताना खूप गंमत येते.
“मी जे नाटय उभं करणं म्हणते, त्याचाच तो भाग आहे. प्राण्याचं एकदा मानवीकरण केलं की त्यात स्वभावाचाही भाग आला. ‘माझ्याकडे बघा ना ‘ असा स्वभाव असणारी ही मुंगी आहे.  पुस्तक वाचताना-बघताना मुलाला चित्रातले हे बारकावे दिसतात का, जाणवतात का असा चित्र-साक्षरतेचा, निरीक्षणाचा भागही त्यात आहे. शिवाय ‘मुंगी शी करते का?’ असा प्रश्नही मुलांना पडू शकतो कारण ती करताना तर दिसत नाही. मजेदार पद्धतीनं असे अनेक बारकावे गोष्टीत आणता येतात.”

प्रश्न : कोणत्याही गोष्टीतून बोध मिळायला हवा का? जर काही मूल्यं रुजवायची असतील तर ती कशाप्रकारे गोष्टीत यावीत?
“एखाद्या गोष्टीतून तात्पर्य काढून ते गोष्टीखाली लिहिणं, किंवा थेट मुलांना उपदेश करणं हे प्रकार न रुचणारे आहेत. गोष्टीतून मुलांना काही बोध व्हायला व्हावा, जीवनदृष्टी मिळायला हवी हे योग्यच. पण गोष्टीत तसं थेटपणे न म्हणता, गोष्ट वाचून आपोआप बोध मुलांपर्यंत पोचवणं हे लेखकाचं कौशल्य आहे. मुळात मुलांना आवडेल अशी ती चांगली ‘गोष्ट’ हवी. कोरड्या आणि रुक्ष लेखनातून मांडलेला मुद्दा मुलांच्या लक्षात राहत नाही. कथा सांगण्याची हातोटी असेल तर थेट उपदेश टाळून मुलांपर्यंत चांगली मूल्यं, जीवनशिक्षण नक्कीच पोचतं.”  

Click here to read the story on StoryWeaver. 

Previous Article

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

DISCLAIMER :Everything here is the personal opinions of the authors and is not read or approved by pratham books before it is posted. No warranties or other guarantees will be offered as to the quality of the opinions or anything else offered here